DGCA : ‘दादां’च्या अपघातावरून रोहित पवार (Rohit Pawar) आक्रमक; मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात ठिय्या अन् DGCA विरोधात एफआयआरचा पवित्रा!
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit-Pawar)यांच्या विमान अपघाताच्या चौकशीवरून राज्याचे राजकारण आता पोलीस ठाण्याच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचले आहे. “दादांना न्याय मिळालाच पाहिजे, ही महाराष्ट्राची भावना आहे,” असे ठणकावून सांगत आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि अमोल मिटकरी आज मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल झाले.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) संबंधित विमान कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप करत रोहित पवारांनी (Rohit Pawar) थेट गु्न्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली आहे.
पोलीस ठाण्याबाहेर पत्रकारांशी बोलताना रोहित पवार यांनी प्रशासकीय यंत्रणेवर गंभीर ताशेरे ओढले. “२८ जानेवारीला सादर झालेला डीजीसीएचा अहवाल म्हणजे केवळ दिखावा आहे. व्हीएसआर (VSR) कंपनीच्या विमानांची उड्डाणे थांबवून तुम्ही कोणाची दिशाभूल करत आहात? मूळ मुद्दा कंपनीच्या मालकावर आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचा आहे,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणात कंपनीला ‘क्लीन चीट'(Clean Cheat) देण्याचा घाट घातला जात असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला.
रोहित पवार (Rohit Pawar) यांनी या प्रकरणाला आता राजकीय वळण देत केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. “ज्या कंपनीचा संबंध एका टीडीपी (TDP) नेत्याशी जोडला जात आहे, तिला पाठीशी का घातले जातेय? जोपर्यंत जबाबदार व्यक्ती तुरुंगात जात नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच, आज मरीन ड्राईव्ह पोलिसांनी एफआयआर (FIR) नोंदवून घेतला नाही, तर उद्या बारामतीत हजारो लोकांसह पोलीस ठाण्यासमोर ठिय्या देण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
तपासाची दिशा भरकटत चालल्याचा आरोप करत रोहित पवारांनी येत्या दोन दिवसांत आणखी एक मोठी पत्रकार परिषद घेण्याचे जाहीर केले आहे. या पत्रकार परिषदेत ते काही नवीन आणि स्फोटक पुरावे मांडण्याची शक्यता असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दादांच्या अपघाताचे गूढ उकलण्यासाठी आता हा संघर्ष रस्त्यावर उतरण्याची चिन्हे दिसत आहेत.