Centenary-of-the-RSS : इतिहासाच्या पार्श्वभूमीवर
भारतीय समाजजीवनात एकात्मता, राष्ट्रनिष्ठा आणि संस्कारित पिढी घडविण्याचे महान कार्य करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यंदा शताब्दी वर्षाचा अभिषेक लाभत आहे. संघाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर हे कार्य केवळ एका संस्थेचे नव्हे तर एका अखंड राष्ट्रचेतनेचा हा प्रवास आहे.
संघाची स्थापना विजयादशमीच्या दिवशी, विक्रम संवत १९८२ म्हणजेच २७ सप्टेंबर १९२५ रोजी डॉ. केशव बलिराम हेडगेवार यांनी केली. सुरुवातीच्या त्या पहिल्या सभेत अवघे वीस-पंचवीस जण सहभागी झाले होते. त्याच बैठकीत हिंदू समाजाच्या संघटनाची बीजे रोवली गेली. पुढे १७ एप्रिल १९२६ रोजी या संस्थेला औपचारिक नाव देण्यात आले – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS).
दैनिक शाखा व संघकार्याची सुरुवात(Centenary-of-the-RSS)
२८ मे १९२६ रोजी नागपूरमधील मोहितेच्या वाड्यातील मैदानावर विधिवत दैनिक शाखेचा प्रारंभ झाला.
संघाची शाखा भगव्या ध्वजाला वंदन करून प्रारंभ होते व भारत मातेला वंदन करून पूर्ण होते. शाखेत कोणत्याही देवतेची, व्यक्तीची प्रतिमा ठेवली जात नाही. सर्वोच्च स्थान ध्वजाला दिले आहे. ध्वजासमोर सर्व समान उच्च नीच शिक्षित अशिक्षित शहरी ग्रामीण अशा कोणत्याही प्रकारच्या भेदाला स्थान नाही.
पुढे १९ डिसेंबर १९२६ रोजी डॉ. हेडगेवार यांना संघाचे पहिले सरसंघचालक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. १९२७ मध्ये प्रथम शिक्षणवर्ग (OTC) आयोजित झाला. १९२८ मध्ये गुरुपौर्णिमेला भगवाध्वजपूजनासह गुरुदक्षिणा, प्रतिज्ञा कार्यक्रम आणि प्रथम शिक्षा शिबिर घेण्यात आले. त्याच काळात घोषवादनासह पथसंचलनाचीही सुरुवात झाली.
१९२९ मध्ये प्रथमच डॉ. हेडगेवार(Dr. Hedgewar) यांना संघस्थानावर सरसंघचालक प्रणाम देण्यात आला. त्याच वर्षी अनौपचारिक स्वरूपात प्रचारक परंपरेची सुरुवात झाली. १९३२ मध्ये मात्र ही व्यवस्था अधिकृत झाली आणि बाबासाहेब आपटे, दादाराव परमार्थ, रामभाऊ जामघडे व गोपालराव येरकुंटवार यांना प्रचारक म्हणून विविध ठिकाणी पाठविण्यात आले.
१९३० मध्ये जंगल सत्याग्रहाच्या वेळी डॉ. हेडगेवार यांनी स्वतः सरसंघचालकपदावरून बाजूला होत डॉ. परांजपे यांच्याकडे दायित्व दिले. सत्याग्रह करून ते तुरुंगात गेले आणि तिथूनही नवे कार्यकर्ते उभे केले. १९३४ मध्ये वर्धा येथे संघाच्या शिबिरात महात्मा गांधी आले आणि स्वयंसेवकांमधील अस्पृश्यतेचा पूर्ण अभाव पाहून ते अत्यंत प्रभावित झाले.
१९३९ मध्ये सिंदी येथे झालेल्या बैठकीत संस्कृतमधील आज्ञा व प्रार्थना निश्चित करण्यात आली. हा बदल १९४० च्या शिक्षणवर्गापासून लागू झाला. २१ जून १९४० रोजी डॉ. हेडगेवार यांचे निधन झाले, मात्र त्याआधीच त्यांनी माधवराव सदाशिव गोलवलकर (गुरुजी) यांना द्वितीय सरसंघचालक म्हणून मनोनीत केले होते.
१९४२ मध्ये इंग्रज सरकारने संघाच्या परेड व सैनिकी स्वरूपाच्या कार्यक्रमांवर बंदी घातली. त्यावेळी पर्यायी स्वरूपात विविध खेळांचा समावेश करण्यात आला. पुढे काळानुरूप संघकार्याच्या शारीरिक पद्धतीत बदल होत गेले. १९७७ मध्ये नियुद्ध व योगचाप या नव्या पद्धतींचा समावेश करण्यात आला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा(RSS) हा इतिहास एका सामाजिक-सांस्कृतिक क्रांतीची गाथा आहे. संघाने राष्ट्रजीवनात संघटनेचे बीज रोवून आज शताब्दी वर्षात प्रवेश केला आहे. शिस्त, त्याग, साधना आणि राष्ट्रभक्ती या मूल्यांच्या आधारे उभा राहिलेला हा प्रवास भारतीय समाजासाठी प्रेरणादायी आहे.
शब्दांकन: श्रीकांत तिजारे