मुंबई : ऐन दिवाळीच्या आनंदमय वातावरणात हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ आणि बहुगुणी अभिनेते असरानी (गोवर्धन असरानी) यांचं वयाच्या ८४व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होते आणि आरोग्य निधी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारी सुमारे ४ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती त्यांच्या मॅनेजर बाबूभाई थिबा यांनी दिली.
संध्याकाळी सांताक्रूझमधील शास्त्री नगर येथे त्यांच्या कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पडले.
असरानी (Asrani)यांनी आपल्या कारकिर्दीत ५० वर्षांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीत आपली अमिट छाप सोडली. १९६७ मध्ये ‘हरे कांच की चुडियाँ’ या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आणि नंतर अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. त्यांच्या ‘शोले’ चित्रपटातील “हम अंग्रेजों के ज़माने के जेलर हैं” हा डायलॉग आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.
असरानी यांनी विनोदी ते गंभीर अशा विविध भूमिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांनी राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केलं. हिंदीसह गुजराती आणि मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी अभिनय केला होता.
१९७३ मध्ये असरानी(Asrani) यांनी अभिनेत्री मंजू बन्सल यांच्याशी विवाह केला. त्यांचा मुलगा नवीन असरानी अहमदाबादमध्ये दंतवैद्य (डेन्टिस्ट) आहे.
कलाविश्वातील कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियावरून असरानी यांना श्रद्धांजली अर्पण केली असून, “एक युग संपलं” अशा शब्दांत त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं जात आहे.
असरानी यांच्या स्मितहास्याने रंगलेले क्षण कायम स्मरणात राहतील.