Akola-fire-News : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील अडगाव येथे गुरुवारी संध्याकाळी भीषण आग लागून मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये एका सहा वर्षीय चिमुरडीचाही समावेश आहे.
घटना कशी घडली? (Akola-fire-News)
अडगाव येथील आठवडी बाजाराजवळ शेख इब्राहिम यांच्या मालकीच्या घरात अनिल उकर्डा चव्हाण (Anil Ukarda Chavan) हे कुटुंबासह भाडेकरू म्हणून राहत होते. गुरुवारी संध्याकाळी सुमारे सात वाजता अचानक घराला आग लागली. काही क्षणांतच आगीने संपूर्ण घराला वेढलं.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, घरात मोठ्या प्रमाणात डिझेल (Diesel) साठवून ठेवलेले होते. आगीचा संपर्क डिझेलशी आल्याने भीषण स्फोट (Terrible-explosion) झाला आणि ज्वाळा घराबाहेर पसरल्या. त्यामुळे आत अडकलेल्या लोकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.
मृतांची नावे
या आगीत स्वरा प्रभुदास सोळंके (वय 6), अनिल उकर्डा चव्हाण (वय 27) आणि रत्ना उकर्डा चव्हाण (वय 55) यांचा मृत्यू झाला. स्वरा आणि अनिल यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला, तर रत्ना चव्हाण यांना गंभीर भाजल्यामुळे रुग्णालयात नेत असताना वाटेतच प्राण गमवावे लागले. स्वरा ही रत्ना चव्हाण यांच्या भावाची मुलगी होती.
स्थानिकांची धावपळ
आग लागल्याचे समजताच गावकरी तातडीने विझवण्यास धावले. ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा सुरू केला. तेल्हारा व अकोट येथून अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळाले, मात्र तोपर्यंत तिघांचे प्राण गेले होते.
तपास सुरू
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. फॉरेन्सिक लॅबचे पथकही दाखल झाले असून आगीचे नेमके कारण व डिझेल साठ्याबाबत तपास सुरू आहे.
गावात शोककळा
या दुर्घटनेमुळे अडगाव परिसरात शोककळा पसरली आहे. नागरिकांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहानुभूती व्यक्त केली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.