Swami-Samarth : चैत्र शुद्ध द्वितीया! हा दिवस केवळ एका तिथीचा उल्लेख नसून, तो अखिल ब्रह्मांडनायक, अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ(Shri Swami Samarth) महाराजांच्या प्रकट होण्याचा मंगलमय सोहळा आहे. “कलियुगातून दत्तयुग हे तुवांच निर्मियले” या ओळीप्रमाणे, स्वामींचे अवतरण हे मानवी जीवनातील अंधकार दूर करून चैतन्याची गुढी उभारण्यासाठी झाले. आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात स्वामींचे विचार आणि त्यांनी दिलेला ‘तारक मंत्र’ हे केवळ आध्यात्मिक आधार नसून ते जगण्याचे एक सामर्थ्यशाली तत्त्वज्ञान आहे.
स्वामींच्या शिकवणीचा केंद्रबिंदू(Swami-Samarth)
स्वामींच्या शिकवणीचा केंद्रबिंदू म्हणजे ‘निर्भयता’. तारक मंत्रातील पहिलीच ओळ सांगते, “नि:शंक हो, निर्भय हो मना रे | प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे ||”. मानवी जीवनात भीती ही प्रगतीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा असते. कधी भविष्याची भीती, कधी अपयशाची, तर कधी अस्तित्वाची. स्वामींनी ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’ या अभयवचनाद्वारे भक्ताला मानसिक गुलामगिरीतून मुक्त केले. ज्याच्या पाठीशी प्रत्यक्ष ‘दत्त गुरुराया’ उभे आहेत, त्याला कोणत्याही संकटाचे भय उरत नाही, हा आत्मविश्वास स्वामींनी जागवला.
‘स्वामी समर्थाष्टका’मध्ये भक्त अत्यंत आर्त स्वरात म्हणतो, “असे पातकी दीन मी स्वामी राया | पदी पातलो सिद्ध व्हा उद्धराया ||”. येथे शरणागतीचा सर्वोच्च भाव दिसून येतो. जेव्हा मनुष्य आपला अहंकार सोडून भगवंताच्या चरणी लीन होतो, तेव्हाच त्याला खऱ्या आनंदाची प्रचिती येते. स्वामींनी कधीही केवळ कोरड्या तत्त्वज्ञानाचा प्रसार केला नाही, तर त्यांनी भक्तांना ‘प्रचिती’ दिली. “अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी” याचा अर्थ असा की, स्वामींच्या केवळ स्मरणानेच अशक्य गोष्टी शक्य होतात. मात्र, ही प्रचिती येण्यासाठी “खरा होई जागा श्रद्धेसहित” ही अट स्वामींनी घातली आहे. जोपर्यंत आपली श्रद्धा जागी होत नाही, तोपर्यंत स्वामींचे हात आपल्याला सावरू शकत नाहीत.
समाजातील विषमता दूर करण्याचा प्रयत्न
स्वामी समर्थांच्या स्तुतीमध्ये “आजानाबाहू दत्तदिगंबर पूर्ण कृपामूर्ती” असे त्यांचे वर्णन केले आहे. ते केवळ एक योगी नव्हते, तर ते ‘कल्पवृक्ष’ होते. त्यांनी दीन-दलितांची सेवा केली, समाजातील विषमता दूर करण्याचा प्रयत्न केला आणि अनाथ-अपंगांना आधार दिला. “दिन दयाळा स्वामी कृपाळा तोडिसी भवबंध” या ओळीतून त्यांच्या करुणेचा प्रत्यय येतो. आजच्या सामाजिक परिस्थितीत, जिथे माणूस माणसापासून दूर जात आहे, तिथे स्वामींची ही ‘समर्थ सेवा’ आपल्याला दीनांच्या कल्याणासाठी प्रवृत्त करते. त्यांच्या सेवेचा खरा मार्ग म्हणजे केवळ जप-जाप्य नसून, समाजातील गरजूंच्या हाकेला ओ देणे हा आहे.
स्वामींचे चरित्र आणि त्यांनी दिलेले साहित्य हे मानवी मनाचे उत्तम समुपदेशन करणारे आहे. “नको डगमगू स्वामी देतील साथ” हा विचार नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी संजीवनी ठरतो. “विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ” यातून त्यांनी उपासनेची दिशा स्पष्ट केली आहे. स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त केवळ अक्कलकोटला जाणे किंवा उत्सव साजरा करणे पुरेसे नाही, तर त्यांच्या ‘तर्कतीर्थ’ विचारांना आत्मसात करणे आवश्यक आहे.
अशक्यही शक्य करतील स्वामी
स्वामी समर्थ म्हणजे केवळ एक प्रतिमा नसून ते एक जिवंत तत्त्व आहे. “अशक्यही शक्य करतील स्वामी” हा केवळ शब्दसमूह नसून तो लाखो भक्तांचा अनुभव आहे. प्रकट दिनाच्या निमित्ताने आपण हे संकल्प करूया की, आपल्या आयुष्यात कितीही संकटे आली, तरी स्वामींच्या चरणांवरील विश्वास ढळू देणार नाही. कारण, “जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय?” या न्यायाने जिथे स्वामी आहेत, तिथे पूर्णता आणि समाधान निश्चितच आहे.
अनंतकोटी ब्रह्मांडनायक भक्ताभिमानी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय!
श्रीकांत भास्कर तिजारे
९४२३३८३९६६