Priya-Marathe-passed-away
मुंबई : मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे(Priya-Marathe) यांचे 31 ऑगस्ट रोजी सकाळी मुंबईतील मिरा रोड येथील निवासस्थानी निधन झाले. त्या ३८ वर्षांच्या होत्या. गेल्या वर्षभरापासून त्या कॅन्सरशी झुंज देत होत्या, मात्र अखेर त्यांनी या आजारासमोर हार मानली.
प्रिया मराठे यांनी ‘पवित्र रिश्ता’ या गाजलेल्या मालिकेत ‘वरषा’ ही भूमिका साकारली होती. त्यांच्या अभिनयातील सहजता आणि भावनिक ताकद यामुळे त्या प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिल्या. त्यांनी ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ यांसारख्या मराठी मालिकांमध्येही लक्षवेधी भूमिका साकारल्या.
त्यांच्या शेवटच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये त्यांनी पती शंतनु मोघे यांच्यासोबत जयपूरच्या आमेर किल्ल्यातील आठवणी शेअर केल्या होत्या. त्या पोस्ट आता चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू आणत आहेत.
अभिनेत्री अंकिता लोखंडे यांनी भावनिक श्रद्धांजली वाहताना लिहिले, “प्रिया माझी ‘पवित्र रिश्ता’मधील पहिली मैत्रीण होती. ती नेहमी माझ्या आनंदात आणि दुःखात माझ्या सोबत होती. तिचं जाणं मनाला चटका लावणारं आहे.”
प्रिया यांचा अभिनय, त्यांची सकारात्मक ऊर्जा आणि सहकलाकारांशी असलेली आत्मीयता यामुळे त्या कायमच आठवणीत राहतील. त्यांच्या जाण्याने मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.Priya-Marathe-passed-away
ओम शांती.