विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या(Budget Session) दुस-या दिवशी विधानसभेच्या कामकाजपत्रिकेवरील कोणतेही कामकाज होवू शकले नाही. हेच आजच्या कामकाजाचे वैशिष्ट्य सांगता येईल. समाजवादी पक्षांचे सदस्य अबु असिम आझमी यानी काल माध्यमांसमोर बोलताना केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांवरून संतप्त झालेल्या सत्ताधारी भाजप शिवसेना सदस्यांनी सभागृहात अबु आझमी(Abu Azmi) यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची आग्रही मागणी केल्याने सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले त्यामुळे सभागृह तीनवेळा तहकूब करावे लागले. तर त्यानंतरही कामकाज करणे अशक्य असल्याने दुपारी १२.१४ वाजता अध्यक्ष राहूल नार्वेकर (Rahul Narvekar)यांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले. हेच आजच्या कामकाजाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
सकाळी अकरा वाजता विधानसभेचे कामकाज सुरू होताच संतप्त भाजप सदस्य महेश लांडगे यांनी अबु आझमी यांच्या वक्तव्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज(Chhatrapati Shivaji Maharaj), धर्मवीर संभाजी महाराज (Sambhaji Maharaj)आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या शिवप्रेमी नागरीकांमध्ये संतापाची भावना असल्याचे सांगितले. ते म्हणाले की अबु आझमी यांनी जाणिवपूर्वक हिंदू शिवप्रेमी नागरीकांच्या भावना भडकविण्यासाठी हे वक्तव्य केले असून त्याबद्दल त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यानंतर भाजप सदस्य अतुल भातखळकर यानी देखील अबु आझमी नेहमीच अश्या प्रकारच्या हिंदूच्या भावना भडकविणारी वक्तव्ये करत असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, छत्रपती संभाजी राजे यांच्यावर अनन्वित अत्याचार करणारा, स्वत:च्या बापाला आणि भावाना निर्दयीपणे ठार करणारा, हिंदूवर जिझीया सारखा कर लादणारा, तुळजापूरच्या भवानी मंदीराचा विध्वंस करण्याचा प्रयत्न करणा-या औरंगजेबाचे उदात्तीकरण करणा-या अबु आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा अशी मागणी त्यानी केली.
त्यानंतर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील भाजप सदस्यांच्या वक्तव्यांचे समर्थन केले. ते म्हणाले की, सभागृहात अबु आझमी यांच्याकडून नेहमीच अश्या प्रकारे सामाजिक सौहार्द बिघडवणारी वक्तव्ये केली जातात. यावेळी देखील आझमी यांनी जे वक्तव्य केले आहे त्यामुळे त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल केला पाहीजे अशी मागणी त्यानी केली. त्यानंतर अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी विरोधी बाकावरील शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांना बोलण्याची संधी दिली. भास्कर जाधव यांनी आपण नियम ९७ अन्वये सभागृहात प्रश्नोत्तरे रहित करून आझमी यांच्या वक्तव्यावरील मुद्यावर लक्ष वेधल्याचे सांगितले. त्यावेळी सभागृहात सत्ताधारी बाजुचे सदस्य वेलकडे धावले. आणि गदारोळ सुरू झाला. यावेळी सत्ताधारी बाजूच्या सदस्यांकडून ‘जय भवानी जय शिवाजी’ च्या घोषणा दिल्या जात होत्या तर अनेक सदस्यांनी आपली आसने सोडून पुढे जात अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत निदर्शने सुरू केली होती. या सदस्यांना जागेवर जाण्यासाठी वांरवार सूचना देण्यात आल्या मात्र यावेळी दोन्ही बाजूच्या सदस्यांकडून जोरदार नारेबाजी सुरू असल्याने प्रथम अकरा वाजून आठ मिनीटानी कामकाज दहा मिनीटांसाठी तहकूब केल्याची घोषणा अध्यक्ष राहूल नार्वेकर यानी केली.
त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू झाले त्यावेळी गोंधळातच विरोधीपक्षांच्या बाजूने शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी अबु आझमी(Abu Azmi) यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. त्यावेळी सत्ताधारी सदस्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होती तर विरोधी बाजूच्या सदस्यांनी देखील त्याचवेळी घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर सभागृहात कामकाज करणे अशक्य असल्याने अध्यक्ष नार्वेकर यांनी कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केले.
पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरू झाले त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी गोंधळातच आपली भुमिका मांडली. त्यावेळी दोन्ही बाजूचे सदस्य आपल्या मागणीवर ठाम होते, त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होती. त्यातच एकनाथ शिंदे यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की समाजवादी पक्षाचे सदस्य अबु आझमी यांच्या वक्तव्यामुळे सदस्यांच्या नव्हे तर संपूर्ण शिवप्रेमी नागरीकांच्या भावना भडकविण्याचे काम केले जात आहे. धर्मवीर संभाजीराजे याचे कसे हाल त्या औरंगजेब(Aurangzeb) याने केले ते त्या छावा सिनेमातून समोर आले आहे. मात्र आझमी यांच्याकडून त्याच औरंगजेब यांचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने आझमी यांच्यवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ त्यांचे सदस्यत्व निलंबीत केले पाहीजे. शिंदे यांच्या वक्तव्यांच्या वेळी विरोधीबाकावरून शिवसेना ठाकरे गटाचे सदस्य जोरदार घोषणा देत होते. त्यानंतर सत्ताधारी सदस्यंकडूनही नारेबाजी सुरू झाली. देवयानी फरांदे आणि अन्य सदस्यांनी नंतर अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत जावून आग्रहीपणे आपली मागणी मांडायचा प्रयत्न केला. त्यावेळी सभागृहात प्रचंड गोंधळाची स्थिती होती. त्यावेळी तालिका अध्यक्ष संजय केळकर यांनी कामकाज १५ मिनीटांसाठी तहकूब केल्याची घोषणा केली.
त्यानंतर पुन्हा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी कामकाज सुरू केले तेंव्हा त्यांनी सद्स्यांना पुढील कामकाज करण्यासाठी आपापल्या जागेवर जाण्याची सूचना केली मात्र सत्ताधारी भाजप शिवसेना सदस्यांकडून नारेबाजी आणि संतप्त घोषणाबाजी सुरू होती त्यावेळी सभागृहात गोंधळाची स्थिती होती. शिवसेना सदस्य मराठी भाषा मंत्री उदय सामंत यानी गोंधळातच अबु आझमी यांच्या वक्तव्यांमुळे सदस्यांच्या भावना दुखावल्या असून आझमी यांना निलंबीत केल्याशिवाय सभागृहाचे कामकाज सुरू होवू शकणार नसल्याचे सांगितले. त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिले त्यामुळे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी बारा वाजून १४ मिनीटांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब करत असल्याची घोषणा केली. त्यामुळे आजच्या दिवसभराच्या कामकाज पत्रिकेवरील कोणतेही कामकाज होवू शकले नाही.
किशोर आपटे
(लेखक व ज्येष्ठ राजकीय पत्रकार)